शुद्रांंच्या उत्पत्तीबद्दलचा ब्राह्मण ग्रंथांंतील सिध्दांत (भाग - 1)




                        ब्राह्मण लोकांनी जे धार्मिक ग्रंथ लिहिलेले आहेत त्यात शुद्रांची उत्पत्ती कशी झाली, याबद्दल स्पष्टीकरण आहे काय?  जग, मनुष्य आणि निरनिराळे वर्ण ही उत्पन्न कशी झाली, याबद्दलच्या मनोरंजक कथा सदर ग्रंथात खच्चून भरलेल्या आहेत. शूद्रांची उत्पत्ती कशी झाली, याचा शोध लावण्यासाठी या कथांमधून काही धागादोरा मिळतो की काय, हे पाहू या. वास्तविक पहाता शूद्रांची उत्पत्ती कशी झाली, याबद्दलचा ब्राह्मण ग्रंथांत जो सिद्धांत मांडलेला आहे, त्याचे मंडन करण्यासाठी ब्राह्मण ग्रंथांत भरपूर कारणे दिली असली पाहिजेत. पण हीच कारणे तो सिद्धांत सिद्ध करण्यास कितपत समर्थ ठरतात, हे तपासून पहाणे जरूर आहे.
                                                                             
                                                                         (१)


                या चर्चेला वेदांपासून सुरुवात करू या. ऋग्वेदातील पुरुषसूक्तात शुद्रांच्या उत्पत्तीसंबंधी कोणता सिद्धांत मांडलेला आहे व तो कितपत खरा किंवा खोटा आहे.याबद्दलची सविस्तर चर्चा पहिल्या प्रकरणात दिलेली आहे. याविषयासंबंधी इतर वेदांमध्ये काय प्रतिपादन केलेले आहे, त्याबद्दल विचार करू या.

                 यजुर्वेद के दोन भाग आहेत - शुक्ल यजुर्वेद व कृष्ण यजुर्वेद. पहिल्यांदा शुक्ल यजुर्वेदाकडे वळू या. या वेदांत वाजसनेयी संहिता आहे. तीत शूद्रांच्या उत्पत्तीबद्दल दोन सिद्धांत मांडलेले आहेत. त्यांपैकी जो एक सिद्धांत आहे तो-पुरुष सूक्तात मांडलेला सिद्धांत होय. पुरुषसूक्ताचा सिद्धांत १६ श्लोकांत मांडलेला आहे. ते सोळा श्लोक वाजसनेयी संहितेत जसेच्या तसे उद्धृत केलेले आहेत व त्यात दुसऱ्या सहा श्लोकांची भर टाकलेली आहे. या श्लोकांचे अर्थ खाली दिलेत आहेत---
                (१७) त्याला विश्वकर्माने प्रथम उत्पन्न केले. पाणी व पृथ्वीची जीवनसत्त्वे यापासून, त्वष्ट्याने त्याला आकार दिला. तो आकार म्हणजेच सर्व बाजूंनी पसरलेले प्रथमचे पुरुषाचे विश्व होय.

           (१८) या मोठ्या पुरुषाला मी ओळखतो. त्याचा रंग सूर्याचा म्हणजे तिमिरातीत शुभ्र आहे. त्याला जो जाणतो तोच अमर होतो.त्याला ओळखून घेणे हाच मोक्षाचा मार्ग आहे,त्याशिवाय मार्ग नाही होतो. 

             (१९) प्रजापती गर्भाशयातील भागात फिरतो. तो स्वतः अजन्म आहे. परंतु तो अनेक रूपांनी जगात वावरतो. त्याचे मूळस्थान कोणते, हे जाणते लोक जाणतात. मरीचीचे स्थान आपणाला मिळावे, अशी त्याची इच्छा असते.

           (२०) जो देवांना प्रकाश देण्यासाठी स्वतः प्रकाशमान होतो, जो देवांचा परोहित आहे, जो सर्व देवांच्या अगोदर जन्मला, त्या ब्रह्मदेवाला नमस्कार असे!

         (२१) देदीप्यमान ब्रह्मदेवाला उत्पन्न केल्यानंतर देव प्रथम उद्गगारले, "याचे ज्ञान ज्या ब्राह्मणाला झाले, त्याच्या अधीन सर्व देव रहातील."

          (२२) त्याच्या श्री आणि लक्ष्मी या पत्नी होत. दिवस व रात्र या त्याच्या दोन बाजू होत. चांदण्या त्याचे अलंकार होत. अश्विन त्याचे तोंड होय. माझ्या इच्छा पुऱ्या कर. ते दान मला दे. मला माझे सर्व इच्छित दे.

वाजसनेयी संहिता

            वाजसनेयी संहिता  जो दुसरा सिद्धांत मांडलेला आहे, तो पुरुषसूक्तातील सिद्धांतापेक्षा वेगळ्या स्वरूपाचा आहे. तो सिद्धांत असा 

वाजसनेयी संहिता,  १४-२८ (Muir, Vol. I, p. 18) त्याने एकाबरोबर स्तुती केली, तेव्हा सजीव प्राण्यांची उत्पत्ती झाली. त्याने तिघांबरोबर स्तुती केली, तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाला. भूतनामपती याला त्यांचा राजा केले. त्याने सात जणांबरोबर स्तुती केली, तेव्हा धात्री याला त्यांचा राजा केले. सप्तर्षि उत्पन्न झाले. त्याने नऊ जणांबरोबर स्तुती केली. तेव्हा ऋतू उत्पन्न झाले. तेव्हा आर्तव याला त्यांचा राजा केले. त्याने तेरा जणांबरोबर स्तुती केली. तेव्हा क्षत्रियांना उत्पन्न केले. तेव्हा बृहस्पती याला त्यांचा राजा केले. त्याने एकोणवीस जणांबरोबर स्तुती केली. तेव्हा शूद्र आणि आर्य (वैश्य) यांना उत्पन्न केले. दिवस व रात्र यांना त्यांचा राजा केले. त्याने एकवीस जणांबरोबर स्तुती केली. तेव्हा ज्यांच्या पायाला अखंड खूर आहेत, अशा जनावरांना उत्पन्न केले. वरुण याला त्यांचा राजा केले. त्याने तेवीस जणांबरोबर स्तुती केली, तेव्हा लहान जनावरांची उत्पत्ती केली. तेव्हा वायू याला त्यांचा राजा केले. (ऋग्वेद १०-९०-८ याच्याशी तुलना करून पहा.) त्यान सत्तावीस जणांबरोबर स्तुती केली, तेव्हा सजीव वस्तूंची उत्पत्ती झाली. तेव्हा प्रत्येक पंधरवड्याला त्यांचा राजा केले. त्याने एकतीस जणांबरोबर स्तुती केली. तेव्हा सजाव वस्तूंना स्थिरपणा दिला. तेव्हा प्रजापती परमेष्ठिन् याला त्यांचा राजा केले."

         कृष्ण यजुर्वेदात काय सांगितलेले आहे, पाहू या. या वेदातील तैतरीय संहितेत यासंबंधी एकंदर पाच सिद्धांत मांडलेले आहेत. त्यांपैकी एक ४-३-१० यात सांगितलेला आहे. हा सिद्धांत आणि शुक्ल यजुर्वेदातील वाजसनेयी संहितेत सांगितलेला सिद्धांत (याची माहिती वर दिलेली आहे) हे एकच होत. बाकीचे जे चार सिद्धांत आहेत त्यातून जे शूद्र उत्पत्तीसंबंधी स्पष्टीकरण करतात, त्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे --

                                                             
तैत्तिरीय संहिता

             (१) तैत्तिरीय संहिता, २-४-१३-१ (Muir, Vol. I, p. 22) राजन्य जेव्हा गर्भशयात होता तेव्हा त्याच्याबद्दल देवांना भीती उत्पन्न झाली. देवांनी त्याला गर्भशयात बंधनांनी बांधले. म्हणून हा राजन्य बंधनांनी वेष्टिलेला असाच जन्म पावला. तो जर बंधनविमुक्त असा जन्मला असता तर तो आपल्या शत्रूची कत्तल करीत सुटला असता. एकदा राजन्य बंधनविमुक्त स्थितीत जन्मावा व जन्मल्यानंतर त्याने आपल्या शत्रूंची कत्तल करीत रहावे असे ज्यांना वाटत असेल त्यांनी त्या राजन्याच्यातर्फे परमेश्वराला ऐंद्र बार्हस्पत्य नावाने हवन करावे. राजन्य हा इंद्राची प्रतिमा होय व ब्राह्मण ह बृहस्पती होय. राजन्याची त्याच्या बंधनांपासून सुटका कोणाला करावयाची असेल तर ती त्याने ब्राह्मणातर्फेच केली पाहिजे. ज्या बंधनांनी राजन्य बांधला गेलेला असतो त्या बंधनाचे प्रतीक सोन्याचे करावे व ते सोन्याचे प्रतीक ब्राह्मणाला दान द्यावे म्हणजे राजन्याची बंधने तटातट तुटून जातील व राजन्य मुक्त होईल."
          
तैतरीय ब्राह्मण

          (२) तैतरीय ब्राह्मण, ७-१-१-४ (Muir, Vol. I, P. 16) "मला काहीतरी संतती व्हावी" अशी प्रजापतीला इच्छा झाली. त्याने स्वत:च्या तोंडातून त्रिव्रत (स्तोम) उत्पन्न केले. त्यानंतर याने अग्नी, देवता, गायत्री वृत्त सामन् (रथांतर) आणि मनुष्यापैकी ब्राह्मण व पशूपैकी बोकड ही उत्पन्न केली. म्हणून ती प्रजापतीची मुख्य संतती होय. कारण ती त्याच्या मुखापासून उत्पन्न झाली. आपल्या छातीपासून व बाहूंपासून त्याने पंचदस (स्तोम) उत्पन्न केले. पंचदसानंतर त्याने देव, इंद्र, त्रिष्टुभ वृत्त, बृहत नावाचे सामन आणि मनुष्यांपैकी राजन्य व जनावरांपैकी मेंढरे ही उत्पन्न केली. म्हणून ही उत्साही आहत; कारण ती उत्साहापासून उत्पन्न केलेली आहेत. त्यान आपल्या बबापासून सप्तदस (स्तोम) उत्पन्न केला. त्यानंतर विश्वदेव नावाचे देव, जागृती वृत्त, वैरूप नावाचा सामन आणि मनुष्यांपैकी वैश्य व जनावरांपैकी गाय ही उत्पन्न केली. म्हणून यांना खाल्ले पाहिजे. कारण त्यांची उत्पत्ती अन्न साठवून ठेवणाऱ्या भागापासून केलेली आहे. ती इतर संततीच्या मानाने संख्येने अधिक आहेत. म्हणून सप्तदसानंतर बऱ्याच छोट्या देवदेवतांची उत्पत्ती करण्यात आली. त्याने आपल्यापायापासून एकवीस (स्तोम) उत्पन्न केला. त्यानंतर त्याने अनुष्टुभ वृत्त, वैराज नावाचे सामन, मनुष्यापैकी शूद्र आणि पशूपैकी घोडा ही निर्माण केली. म्हणून घोडा व शूद्र ही दोन्ही इतरांची वाहने झाली. या कारणामुळे आणि एकविसानंतर कोणताही देवदेवता उत्पन्न केली नाही, म्हणून शूद्र याला यज्ञाचे अधिकार दिलेले नाहीत. त्याचप्रमाणे घोडा व शुद्र यांची उत्पत्ती पायापासून झालेली असल्यामुळे, ती स्वतःच्या पायांच्या श्रमांवर जगतात."
              
अथर्व वेद

           अथर्व वेदा कडे दृष्टी फेकली तर त्यात विश्वोत्पत्तीसंबंधीची चार स्पष्टीकरणे दिसून येतात. त्यापैकी एक ऋग्वेदातील पुरुषसूक्त सांगितलेल्या स्पष्टीकरणाप्रमाणे आहे. ते अथर्ववेद १०-६ मध्ये आहे. दुसरी स्पष्टीकरणे आहेत ती खाली दिली आहेत.

          (१) अथर्व वेद, ४-६-१ (Muir, Vol.I, p.29) “दहा डोकीव दहातोडेस्वरूपाचा ब्राह्मण प्रथमतः जन्मास आला. तो जन्मल्यानंतर प्रथम सोम प्याला. त्याने विषाचे विषारीपण मारून टाकले."

        (२) अथर्व वेद,१५-८-१ (Muir, Vol. I, p.22) "तो (व्रात्य) काममोहित झाला व तेथून राजन्य उत्पन्न झाला."

      (३) अथर्ववेद, १५-९-१(Muir, Vol. I, p. 22) "याबद्दलचे ज्ञान असलेला व्रात्य जर एखाद्या राजाच्या घरी पाहुणा म्हणून आला तर तो राजापेक्षा श्रेष्ठ आहे, अशी राजाने त्याला जाणीव करून द्यावी व तसे वागण्यास त्याला भाग पाडावे. असे केल्याने राजा स्वतःच्या इभ्रतीला किंवा राज्याला जे बाधक होईल असे काही करीत नाही. त्याच्यापासून ब्राह्मण व क्षत्रिय उत्पन्न झाले. ते म्हणाले, "आम्ही आता कशात प्रवेश करावा?

     (शुद्रांंच्या उत्पत्तीबद्दलचा ब्राह्मण ग्रंथांंतील सिध्दांत, भाग - २ लवकरच प्रकाशीत करण्यात येईल )  

Post a Comment

0 Comments