शूद्रांचा कूटप्रश्न - भाग (१)

                                                         
                                                                             ( १ ) 

                       शुद्र हे हिंदी आर्य समाजातील चवथा वर्ग होत हे प्रत्येकाला माहीत आहे. परंतु शूद्र हे पुर्वी कोण लोक होते आणि त्यांचा चवथा वर्ण म्हणून कशी गणना करण्यात आली, याबदल चौकस बुध्दीने विचार करण्याचे फारच थोड्या लोकांनी मनावर घेतले आहे. अशा प्रकाराबाबतीत संशोधन करणे हे अत्यंत महत्वाचे आहे, याबद्दल दुमत नाही. कारण की, आर्य समाजात चवथा वर्ण म्हणून शूद्र लोकांना कसे स्थान मिळाले; हिंदू समाजात उत्तक्रंतीआल्यामुळे की क्रांती घडवूनआणल्यामुळे, हे समजावून घेणे अत्यंत हितावह आहे.

                          शुद्र लोक पूर्वी कोण होते व त्यांची चवथा वर्ण म्हणून कशी गणना करण्यात आली, याबद्दल संशोधन करावयाचे तर त्यासाठी आपणाला प्रथमतः हिंदी आर्य समाजात चहुर्षणय कसे उत्पन झाले, याबदल माहिती करून घेतली पाहिजे व त्या माहितीच्या आधाराने शूद्रांच्या उत्पत्तीचे मुळ स्थान शोधून काढले पाहिजे. ऋग्वेदातील दहाव्या मंडळात नव्वदावी ऋचा आहे. ती पुरुषसूक्त या नावाने प्रसिद्ध आहे. या पुरुषसूक्ताचा आपण संगोपांंग  विचार केला तर चातुर्वर्ण्याचा आपणाला विचार करणे सोपे जाईल.

पुरुषसूक्तात म्हटले आहे की;

(१) पुरुषाला शंभर डोकी, शंभर डोळे, शंभर पाय आहेत. पृथ्वीला सर्व बाजूंनी व्यापल्यानंवर तो दशागुळे शिल्लक राहील.

(२) जे काही आत्तापर्यंत होते व पुढे होईल ते पुरुष स्वतः हे विश्व होय. तो अन्न सेवन करुन प्रसन्न पावतो, म्हणूनच तो अमरत्वाचा भगवान होय.

(३) त्याचे माहत्म्य असे आहे आणि पुरुष यापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याचा चवथा भाग म्हणजे जगातील चराचर वस्तू आणि त्याचा तीन चतुर्थांश भाग हा आकाशात अमर होऊन राहिलेला आहे.

(४)आपल्या तीन चतुर्थांश भागाने पुरुष वरती चढत गेला. त्याचा चवधा भाग इष्ट लोकी उत्पन्न केला. त्यानंंतर त्याचा सर्व ठिकाणी, सर्व वस्तूंवर, ज्या वस्तू खातात व ज्या वस्तु खात नाहीत, अशांवर प्रसार करण्यात आला. 

(५) त्याच्यापासून विराज जन्माला आणि विराजापासून पुरुष जन्मला, तेव्हा तो पृथ्वीच्या मागे व पुढे प्रसुत झाला.
 
(६) जेव्हा देवांनी यज्ञ केला व त्यात पुरुषाला बळी दिले तेव्हा त्या यज्ञाचे लोणी वसंत ऋतु झाला, उन्हाळा यज्ञाचे सर्पण झाला व हिवाळा यज्ञाचे आदर्श झाला.

(७) हा बळी पुरुष प्रथमतः जन्मला व त्यांनी यज्ञाच्या तृणांवर बलिदान दिले. त्याच्याबरोबर देव, संध्या व ऋषी यांचेही बलिदान दिले.

(८) त्या विश्वव्यापक यज्ञापासून दही व लोणी यांचा साठा झाला. या आकाशात भ्रमण करणारे प्राणी व माणसाळलेले व जंगली पशु उत्पन्न झाले.

(९) त्या विश्वव्यापक यज्ञापासून ऋचा, सामन, काव्यरचणे, वृत्ते आणि यजु निर्माण झाली.

(१०) त्याच्यापासून घोडे, ज्यांना दातांच्या दोन पंक्ती आहेत असे पशू उत्पन्न झाले ;  त्यांच्यापासून गाय उत्पन्न झाली, त्याच्यापासून शेळ्या-मेंढ्या उत्पन्न झाल्या.

(११) जेव्हा देवांनी पुरुषाला तोडले तेव्हा त्यांनी त्याचे किती तुकडे केले ? त्या तुकड्यांपैकी कोणता तुकडा त्याचे तोंड होता? कोणते तुकडे त्याचे बाहु होते? कोणते तुकडे त्याच्या मांड्या व पाय होते?

(१२) ब्राह्मण त्याचे तोंड होते, राजन्याला त्याचे बाहू केले, वैश्य म्हणून कोणी होता त्याच्या मांड्या झाल्या. शूद्र त्यांंच्या पायापासून उत्पन्न झाला. 

(१३) चंद्र त्याच्या आत्म्यातून उत्पन्न झाला, सूर्य त्याच्या डोळ्यांपासून, इंंद्र व अग्नि त्यांंच्या मुखातून आणि वायू त्याच्या श्वासोच्छ्वासापासून. 

(१४) त्याच्या बेंबीपासून हवा उत्पन्न झाली. त्याच्या डोक्यापासून आकाश, त्याच पायापासून जमीन, त्याच्या कानापासून (चार) दिशा, अशारीतीने देवांनी जग उत्पन्न केले.

(१५) यज्ञ करीत असलेल्या देवांनी जेव्हा बळी म्हणून पुरुषाला बांधले तेव्हा अग्निभोवती सात काठ्या उभ्या रोवलेल्या होत्या. आणि त्या काठ्यांपासून २१ तुकडे सर्पण म्हणून तयार केले.

(१६) या यज्ञात आहुती देऊन देवांनी यज्ञ केला. हे फार प्राचीन कालाचे यज्ञ विधी होत. या मोठ्या शक्तींनी आकाश व्यापले. तेथे पूर्वी संध्या देवता रहात असे.

                                   (Muir's Original Sanskrit Texts, Vol. L, P. 9) 

            पुरुषसूक्त म्हणजे जगाची उत्पत्ती कशी झाली.हे दाखविणारा एक सिद्धांत आहे.जगाची उत्पत्ती कशी झाली याबद्दलच्या काही ना काही स्वरूपाचा सिद्धात प्रत्येक पुढारलेल्या देशात पुढे मांडण्यात आलेला आहे. इजिप्तच्या लोकांनी जो बाबतीत सिद्धांत मांडलेला आहे. तो पुरुषसूक्त मांडलेल्या सिद्धांताच्या स्वरूपाला जुळेल अशा तर्हेचा आहे. तो सिद्धांत (Encyclopedia of Religion & Ethics Vol. IV.p 145 ) अशे म्हणतो की ख्नुमु या देवाने कुंभाराच्या चाकावर सर्व सजीव प्राण्यांना आकार दिला. जगात जे काही आहे ते सर्व त्याने उत्पन्न कले.तो सर्वजनकांचा जनक व सर्व मातांची माता आहे. त्याने मानव व देव निर्माण (तयार) केला. तो प्रारंभापासुनच सर्वांचा जनक आहे. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ, पाणी, डोंगर इत्यादींचा तो जनक आहे सर्व पक्षी. मासे, हिंसकपशु, जनावरे आणि सर्व कीटक यांच्यात त्याने स्त्री व पुरुष निर्माण केले. इजिप्तच्या लोकांंच्या विश्वोत्पत्तीच्या सिद्धांताला जुळेल अशा तर्हेचा सिद्धांत बायबलच्या जुन्या करारांंतील पहिल्या अध्यायात (विश्वोपत्ती) मांडलेला आहे.

           जगाच्या उत्पत्तीसंबंधी सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत त्यांना व्यावहारिक दृष्टी फारसे महत्व नाही.जगाच्या उत्पत्ती संबंधीची विद्यार्थ्यांची उत्सुकता शांत करणे आणि लहान मुलांच्या मनाची करमणूक करणे, यापलीकडे या सिद्धांताचा काही उपयोग होत नाही. पुरुषसूक्तात जो सिद्धांत मांंडलेला आहे त्यातील काही भाग कोणत्याही उपयोगाचे नाहीत असे म्हणता येईल. परंतु त्या सिद्धांतांतील सर्व भागांसंबंधी असे म्हणता येणार नाही. कारण पुरुषसूक्तातील सर्व श्लोक सारख्या महत्वाचे नाहीत. ११ व १२ हे श्लोक एका प्रकारात येतात व बाकीचे श्लोक दुसर्या प्रकारात येतात. ११ व १२ या श्लोकांशिवाय इतर श्लोक आहेत ते अव्यवहार्य वाटतात. त्यांच्यावर कोणाची मदार नाही. ते कोणा हिंदुंच्या स्मरणातही येत नाहीत, परंतु ११ व १२ हे श्लोक यांची गोष्ट निराळी आहे.विश्वजनकापासून (१) ब्राह्मण किंवा पुरोहित (२) क्षत्रिय किंवा योध्दे , (३) वैश्य किंवा व्यापारी, आणि (४) शूद्र किंवा नोकर, हे चार वर्ग कसे उत्पन्न झाले, याबद्दल प्रायः ११ व १२ हे श्लोक स्पष्टीकरण करतात. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, हे श्लोक केवळ विश्वोत्पत्तीचे स्पष्टीकरण करणारे आहेत, असे मानण्यात येत नाही. हे श्लोक म्हणजे कविकल्पनेतून उतरलेल्या भ्रमिष्टपणाच्या वल्गना होत, असे हिंदी आर्य समजत होते, असे मानणे म्हणजे घोडचूक करणे होय. या श्लोकांचा असा अभिप्रेत अर्थ मानण्यात आलेला आहे की, पुरुषसूक्तात जे चारवर्ग सांगितलेले आहेत त्यावर हुकूम समाजाची घटना करण्यात आली पाहिजे, अशी खुद परमेश्वराची इच्छा आहे. या श्लोकांमध्ये जी भाषा वापरण्यात आलेली आहे तीवरून शब्दश: वरीलप्रमाणे अर्थ निघत नाही हे खरे. परंतु विचारपरंपरेने हा अर्थ मानण्यात आलेला आहे, याबदल शंका नाही. सूक्त रचण्यात सूक्तकारांचा जो हेतू होता  त्या हेतूशी विचारपरंपरेने मानलेला ११ व १२ या श्लोकांचा अर्थ जुळतो, असे म्हटले तर खरोखरच चूक होणार नाही. म्हणून हे श्लोक म्हणजे जगाच्या उत्पत्तीचा सिद्धांत स्पष्ट करणारे केवळ श्लोक आहेत, असे समजून स्वस्थ बसणे ठीक नाही. समाजाची रचना एका विशिष्ट स्वरूपात झाली पाहिजे, अशा अर्थाचा स्पष्ट परमेश्वरी संदेश त्या श्लोकांत मथित केलेला आहे. हे या श्लोकांचे वैशिष्ट्यच लक्षात घेतले पाहिजे. पुरुषसूक्तात समाजाची जी रचना सांगितलेली आहे तिला चातुर्वर्ण्य समजले जाते. परमेश्वरी संदेशाप्रमाणे चातुर्वर्ण्य उत्पन्न झालेले आहे म्हणून त्याला हिंदी-आर्य समाजात अढळ स्थान प्राप्त झालेले आहे, हे नैसर्गिक होय. हिंदी-आर्य समाज आपल्या प्राथमिक अवस्थेत होता तेव्हा त्याने आपली रचना चातुर्वण्याच्या मुशीत तयार करून घेतली. हिंदी-आर्य समाजाचा आकार व घडण ही चातुर्वर्ण्य मुळे विशिष्ट स्वरूपात राहिलेली आहेत.
                       

                 हिंदी-आर्य समाजाला चातुर्वर्ण्य बद्दल जो नितांत आदर उत्पन्न झाला त्याबद्दल जितके बोलावे व लिहावे तितके थोडे आहे. हिंदी-आर्य समाजावर चातुर्वाची जी पकड बसली आहे ती सोडविणे दुरापास्त होय. पुरुषसूक्ताने जी समाजाची रचना प्रतिपादिलेली आहे तिच्याविरुद्ध बुद्धाशिवाय कोणीही ब्र काढलेला नाही. खुद बुद्धाला ती रचना धरून गदगदा हालविता आली नाही. याचे साधे कारण असे की, बुद्ध धर्माची चलती असतांना आणि त्यानंतरही बरेच समाज नियमक उत्पन्न झाले. पण त्यांनी पुरुषसूक्ताने जी समाजरचना सांगितलेली होती, तिला उचलून धरले. एवढेच नव्हे तर, ती रचना भरभक्कम व्हावी म्हणून त्यांनी तिच्यात अनेक प्रकारच्या भरीव योजना घुसडून दिल्या व त्यांना लोकांचा पाठिंबा मिळविला. पुरुषसूक्तातील समाजरचनेला समाजनियमकांंनी कसे उचलून धरले या बद्दलची पुष्कळ उदाहरणे देता येतील. यासंबंधी आपस्तंब धर्मसूत्र आणि वसिष्ठ धर्मसुत्र यातील उदाहरणे देता येतील. आपस्तंब धर्मसूत्रात म्हटले आहे की;

            "ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा चार जाती आहेत. यांच्यात प्रत्येक प्रथमची जात तिच्या पुढच्या जातीपेक्षा जन्माने श्रेष्ठ आहे. (प्रश्न १ 'पाताळ १, खंड १, सूत्रे ४ - ५). शूद्र जात वगळून बाकीच्या सर्व जातींना आणि ज्यांनी वाईट कृत्ये केली असतील अंशा ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या लोकांना वगळून बाकीच्या सर्व जातीतील लोकांना (१) उपनयन (२) वेदाभ्यास व (३) यज्ञकर्मे याबद्दल अधिकार आहेत." (प्रश्न १, पाताळ १, खंड १, सूत्र ६) 
    
        याच गोष्टी वसिष्ठ धर्मसूत्रांत सांगितलेल्या आहेत.
        ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा चार जाती (वर्ण) आहेत.
        ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य जातींना द्विज म्हणतात.
        त्यांचा पहिला जन्म त्यांच्या मातेपासून; दुसरा जन्म उपनयन विधीपासून. दुसन्या जन्मात सावित्री ही त्यांची माता व गुरू हा पिता.
        गुरुला पिता म्हणतात कारण तो वेदाभ्यासाला मदत करतो. (अध्याय २, सूत्रे १ - ४) प्रत्येक जातीची उत्पत्ती आणि विशिष्ट धर्मकृत्ये यामुळे चार जाती परस्परांपासून भि झालेल्या आहेत. वेदांत पुढील भाग आहे, "ब्राह्मण त्याचे मुख होता, क्षत्रिय त्याचे बाहू होता, वैश्य त्याच्या मांड्या शूद्र त्याच्या पायापासून उत्पन्न झाले."
        पुढील भागात असे म्हटले आहे की, "शद्राला धर्मक्रुत्ये करण्याचा अधिकार नाही."

                    पुरुषसूक्त सांगितलेल्या समाजरचनेच्या पावित्रयाबदहल, थोडेसे का होईना, प्रतिकूल मत प्रदर्शित केले त्या सर्वांना हिंदू समाजाचा शिल्पकार मनू याने नेस्तनाबुत केलेले आहे. कारण मनुने दोन गोष्टी केल्या. पुरुषसूक्तात सांगितलेली समाजरचना ही परमेश्वर इच्छेनुसार झालेली आहे असे आग्रहपूर्वक प्रतिपादन करण्याचा त्याने सपाटा चालविला, ही पहिली गोष्ट तो म्हणतो;

                   "तिन्ही लोकांच्या सुखासाठी परमेश्वराने आपल्या मुखापासून, बाहुपासून, मांड्यांंपासून आणि पायापासून ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य व शूद्र हे उत्पन्न केले (मनुस्मृती  अध्याय १, श्लोक ३१).

               "ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्यामुळे द्विज जाती उत्पन्न होतात; परंतु चवथा वर्ग जो शुद्र याला एकच जन्म आहे." (मनुस्मृती अध्याय १०, श्लोक ४)


अशाप्रकारची विचारसरणी प्रकट करण्यात मनू आपल्या पूर्वीच्या समाज नियमांचे अनुकरण करीत होता, याबद्दल प्रकट शंका नाही परंतु तो त्यांच्याही पुढे एक पाऊल गेला होता.

               "धर्माला अधिकृत आधार देणारी एकुलती एक व शेवटची गोष्ट जर कोणती असेल तर ती वेद होय." असा मनूने दुसरा सिद्धांत मांडला. (मनु, अध्याय २, श्लोक २, श्लोक ६) पुरुषसूक्त हे वेदाचेच एक अंग आहे, हे ध्यानात ठेवले तर हे सहज लक्षात येईल की, पुरुषसूक्त चातुर्वर्ण्य म्हणून समाजरचनेचा जो एक आदर्श मांडलेला होता त्याला मनू परमेश्वरी इच्छेचा आणि अचूकपणाचा मुलामा दिला. चातुर्वर्ण्याची हा मुलामा मनूच्या पूर्वी कोणी दिलेला नव्हता.

                                                                     

                                      ( शूद्रांचा कूटप्रश्न - भाग (२) लवकरच प्रकाशित करण्यात येईल)
              

Post a Comment

0 Comments