शुद्रांंच्या उत्पत्तीबद्दलचा ब्राह्मण ग्रंथांंतील सिध्दांत (भाग - २)

                आता ब्राह्मण या नावाने ओळखले जाणारे जे ग्रंथ आहेत, त्यांच्याकडे आपण वळू या. शतपथ ब्राह्मणात विश्वोत्पत्तीसंबंधीची सहा स्पष्टीकरणे आहेत. त्यातील दोन स्पष्टीकरणे वर्णाची उत्पत्ती कशी झाली, याबद्दल खुलासा करतात. तो खुलासा खालीलप्रमाणे आहे -  शतपथ ब्राह्मण, १४-४-२-२३ (Muir, Vol. I. p.20)

   

शतपथ ब्राह्मण

                  "ब्रह्मदेव (टीकाकाराच्या मते या शब्दाचा अर्थ अग्नीमध्ये राहणारा व ब्राह्मण जातीचे प्रतीक असा देव, असा होतो) पूर्वी हे विश्व होते व ते विश्व एकुलते एक होते. एकुलते एक असल्यामुळे त्याची वाढ झाली नाही. त्याने मोठ्या उत्साहाने क्षात्र उत्पत्र केले. क्षात्र म्हणजे बलशाली देवांचा समूह. ते बलशाही देव म्हणजे इंद्र, वरुण, सोम, रुद्र, पर्जन्य, यम, मृत्यू व इसान. म्हणून क्षात्रापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. म्हणून राजसूय यज्ञ करण्याच्या वेळी ब्राह्मण हा क्षत्रियाच्या खालच्या मानाच्या जागेवर बसतो. ब्राह्मण क्षत्रियाच्या डोक्यावर राज्याधिकाराचा अभिषेक करतो. ब्रह्मदेव हा क्षात्राचे उत्पत्तीस्थान होय. म्हणून राजा जरी सर्वाधिकारी होता तरी ब्रह्मदेव हाच आपला मूळपुरुष होय, या गोष्टींचा त्याला शेवटी आश्रय करावा लागतो. जो ब्रह्मदेवाचा नाश करतो, तो स्वतःच्या मूळस्थानाचा नाश करतो. आपल्या वरिष्ठाला दुखापत करणाऱ्या माणसाची शोचनीय स्थिती होते, तशीच स्थिती ब्रह्मदेवाचा नाश करणाऱ्याची होती. त्याची वाढ झाली नाही. वसू, रुद्र, आदित्य, विश्वदेव, मरुत इत्यादी नावानी ओळखले जाणाऱ्या देव-देवतांची जी लढाऊ पथके ज्यात भरलेली आहेत, असे विश्व त्याने उत्पन्न केले; त्याची वाढ झाली नाही, पुषान् या नावाने ओळखली जाणारी शूद्रांची जात त्याने उत्पन्न केली. ही पृथ्वी पुषान् आहे; कारण ती सर्व चराचर वस्तुमात्रांचे संगोपन करते. त्याची वाढ झाली नाही. त्याने मोठ्या उत्साहाने न्याय (धर्म) या नावाची अत्युत्कृष्ट आकृती उत्पन्न केली. राज्यकर्ता क्षात्र तो हाच न्याय होय. म्हणून न्यायापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. म्हणून न्यायाचा आश्रय घेऊन आशक्त मनुष्य सशक्त माणसाला नमवतो. हा न्याय म्हणजेच सत्य होय. जो मनुष्य सत्य बोलतो त्याला लोक असे म्हणतात की, हा न्याय बोलतो," हे पर्यायाने आपल्या ऐकण्यात येते. कारण न्याय व सत्य ही दोन्ही ब्रह्मदेवाची अंगे आहेत. ब्रह्म, क्षात्र, विश व शूद्र ही ब्रह्मदेवाची अंगे होत. अग्नीच्या आश्रयाने ते देवांमध्ये ब्रह्म झाले, माणसांमध्ये ब्राह्मण झाले; विशच्या आश्रयाने ते मानवी वैश्य झाले आणि शूद्रांच्या आश्रयाने ते मानवी शूद्र झाले. म्हणून देव-देवतांना जर चिरस्थान मिळवावयाचे असेल तर ते अग्नीमध्ये राहाणाऱ्या ब्रह्मदेवाची प्रार्थना करतात.

      विश्वोत्पत्तीसंबंधी तैत्तिरीय ब्राह्मण खालील स्पष्टीकरणे सापडतात - 

(१) तैत्तिरीय ब्राह्मण, १-२-६-७ (Muir, Vol. I, p. 21) "ब्राह्मण जात देवांपासून उत्पन्न झाली; शूद्र असुरापासून उत्पन्न झाले.

(२) तैत्तिरीय ब्राह्मण, ३-२-३-९ हा शूद्र नास्तित्वातून उत्पन्न झाला.”

 

             चार वर्णांची व शूद्रांची उत्पत्ती कशी झाली, याबद्दल जेवढी तर्कटे "ब्राह्मण" या नावाने ओळखलेल्या धर्मग्रंथात रचलेली आहेत, त्या सर्वांचा एकत्रित संग्रह वरील स्तंभात मांडलेला आहे. चार वर्णांच्या उत्पत्तीसंबंधी जी विचारसरणी मांडण्यात आलेली आहे ती सामाजिक दृष्टीने पाहिली तर अननुभूत व असामान्य अशा स्वरूपाची आहे; या विचारसरणीत शूद्राला जे स्थान देण्यात आलेले आहे तेही फार अनैसर्गिक रीतीने. या गोष्टीची जाणीव फार प्राचीन काळच्या ब्राह्मणांना झाली होती. म्हणूनच चातुर्वर्ण्य व शूद्र यांची उत्पत्ती कशी झाली, याचे स्पष्टीकरण त्यांनी निरनिराळ्या त-हेने केलेले आहे. चातुर्वर्ण्य व शूद्र यांच्या उत्पत्तीसंबंधी मांडलेला आपला सिद्धांत हा स्वकपोलकल्पित आहे, याची जाणीव त्यांना होती, म्हणून त्यांनी आपल्या सिद्धांताला पोषक अशी अनेक स्पष्टीकरणे आपल्या धार्मिक ग्रंथांतून मांडली. एरव्ही, इतकी निरनिराळी स्पष्टीकरणे मांडण्याची त्यांना का जरुरी भासली असावी?

               भिन्न भिन्न स्वरूपाची ही अनेक स्पष्टीकरणे पाहून कोणाचेही मन भांबावून जाईल.चार वर्ण पुरुषापासून उत्पन्न झाले, असे काही स्पष्टीकरणे सांगतात; तर काही स्पष्टीकरणे असे सांगतात की चार वर्ण ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाले. चार वर्ण प्रजापतीपासून उत्पन्न झाले, असे काही स्पष्टीकरणे म्हणतात; तर काही स्पष्टीकरणे असे म्हणतात की, चार वर्ण व्रात्यांपासून उत्पन्न झाले. एकाच ग्रंथात उत्पत्तीसंबंधी एकच स्पष्टीकरण असते तर त्याबद्दल शंका घेण्यास कारण मिळाले नसते. परंतु एकाच ग्रंथात उत्पत्तीसंबंधी निरनिराळ्या स्वरूपाची स्पष्टीकरणे आढळतात, म्हणून याबद्दल शंका उत्पन्न होणे साहजिक आहे. शुक्ल यजुर्वेदात दोन स्पष्टीकरणे आहेत. एकाच्या मते पुरुष तर दुसऱ्याच्या मते प्रजापती हे चार वर्णाचे व शूद्रांचे उत्पत्तीस्थान होय. कृष्ण यजुर्वेदात तीन स्पष्टीकरणे आहेत. त्यांतील दोन्हींच्या मते प्रजापती तर एकाच्या मते ब्रह्मदेव हे चौथा वर्ण व शूद्र यांच्या उत्पत्तीचे स्थान होय. अथर्ववेदात चार स्पष्टीकरणे आहेत. त्यातील एक पुरुषाला, दुसरे ब्रह्मदेवाला व तिसरे व्रात्याला चार वर्ण व शूद्र यांचे उत्पत्तीस्थान मानतात. चवथे स्पष्टीकरण या तिन्हीपेक्षा जास्थ निराळ्या स्वरुपाचे आहे. उत्पत्तीसंबंधी जरी एकच प्रमेय या ग्रंथात मांडलेले दिसले तरी त्यासंबंधीचे तपशील निरनिराळ्या ग्रंथांत निरनिराळे दिसून येतात. ज्या स्पष्टीकरणांत प्रजापती किंवा ब्रह्मदेव याला उत्पत्तीस्थान मानण्यात आलेले आहे, ती स्पष्टीकरणे वेदांतस्वरूपी होत. दुसरी स्पष्टीकरणे मानवी-धर्मगुरूची होत. दोन्ही प्रकारची स्पष्टीकरणे म्हणजे कल्पनेच्या विश्वव्यापी भराऱ्या होत. त्यांच्यात इतिहास किंवा मनाला उमज पाडील असा काहीसा बोध, याचा मागमूसही दिसत नाही. "ब्राह्मण" या नावाने जे ग्रंथ संबोधिले जातातत्याबद्दल प्रो. मॅक्स मुल्लर यांनी खालील उद्गार काढलेले आहेत ‌--

 

प्रो. मॅक्स मुल्लर

"हिंदी मनोवृत्तीच्या ज्या काही घटना आहेत त्यातील एक अत्यंत मनोरंजक घटना ब्राह्मण ग्रंथांवरून दिग्दर्शित केली जाते, यात काही शंका नाही. परंतु वाङ्मयाच्या कसाला जर हे ग्रंथ लावले तर त्या कसाला ते उतरत नाहीत, असे आपणाला दिसून येते. हिंदी समाज ज्यावेळी अत्यंत मागासलेल्या अवस्थेत होता, अशा कळात असंबद्ध विचार आणि अहंकारी भाव यांनी परिप्लुत असलेले वाङ्मय त्या समाजात उत्पन्न झाले, अशी कोणीही स्वतःची समजूत करुण घेणार नाही. कारण, अशा त-हेचे वाङ्मय पुढारेल्या समाजात सुद्धा उत्पन्न होणे मुष्किल आहे. अगदी प्राचीन काळी जे हिंदी वाङ्मय उत्पन्न झालेले आहे त्यात चित्तवेधक विचार, धाडसीपणाने निवेदन केलेली विधाने, तर्कशुद्धपणाने मांडलेली कारणे आणि आश्चर्यकारक पूर्वपरंपरा यांची उणीव दिसत नाही. परंतु, या ग्रंथात इतस्ततः विखुरलेले विचार म्हणजे जणू काही तांब्याच्या आणि शिश्याच्या कोंदणात अत्यंत मोल्यवान हिरे बसविलेले आहेत असे वाटते. उथळ विचार, लंगडी भव्यता, पुरोहितांचे लबाडीचे डावपेच आणि स्थानी अहंभावीपणा ही सदर ग्रंथात भरपूर विखुरलेली आहेत आणि याच बाबी व्या ग्रंथांची सर्वसाधारण रूपरेषा दिग्दर्शित करतात. समाजात पुरोहित वर्गाची अनियंत्रित सत्ता चालू लागली व लोकांत अंधधर्म श्रध्दाळूपणा पसरला तर नव्या जोमाने सर्व बाजूनी होणारी राष्ट्राची प्रगती किती लौकर, धुळीस मिळून जाईल, याची शहानिशा लावण्याची दृष्टी इतिहासकारामध्ये असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्रे भरभराटीच्या काळात असोत किंवा अवनतीच्या काळात असोत, त्यांना पुरोहितांची अनियंत्रित कारवाई आणि जनतेचा अंधश्रद्धाळूपणा यांच्या साथीला बळी पडावे लागते, हे नीटपणे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शतमूर्ख आणि पिसाट आजाऱ्यांची बडबड ध्यानात घेऊन एखादा वैद्य त्याच्या आजाराचे मूळ ज्याप्रमाणे शोधून काढतो, त्याप्रमाणे हिंदी धार्मिक ग्रंथात जे भारुड भरकटलेले आहे, त्याचा अभ्यास करून ते ग्रंथ कोणत्या हेतूनी लिहिले गेले आहेत, हे शोधून काढणे." (Max Muller: Ancient Sanskrit Literature-Panini Office Edition,p.200).

 

Max Muller: Ancient Sanskrit

     चार वर्ण आणि विशेषतः शूद्र यांची उत्पत्ती कशी झाली, याबद्दल ब्राह्मण ग्रंथात जी अनुमाने मांडण्यात आलेली आहेत ती वाचल्यानंतर मॅक्स मुल्लर यांच्या उपरिनिर्दिष्ट शब्दांचे महत्त्व पूर्णपणे मनाला पटते. ही सर्व अनुमाने म्हणजे शतमुर्खाची बडबड किंवा माथेफिरूची आरडाओरड होय, यात शंका नाही. ती अनुमाने अशा स्वरूपाची आहेत म्हणूनच ज्याला एखाद्या मानवी घटनेची कोडे सरळपणे उकलण्यासाठी त्या घटनेचा अभ्यास करण्याची इच्छा होईल त्याला ते कोडे सरळ रीतीने सोडविण्यास या अनुमानांचा काहीच उपयोग होणार नाही. इतिहासाच्या विद्यार्थ्याला तर त्यांचा कवडीमात्रही उपयोग होणार नाही, कारण त्यांना ऐतिहासिक पुरावा या दृष्टीने काहीच महत्त्व नाही.


                    ( प्रकरण तिसरे लवकरच प्रकाशित होनार. )


Post a Comment

0 Comments