शुद्रांचा दर्जा कोणता , याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथांंतील प्रमेय (भाग १)

                         शुद्रांचा दर्जा कोणता , याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथांंतील प्रमेय (भाग १)

             
       शूद्रांची उत्पत्ती कशी झाली
, याबद्दलची स्पष्टीकरणे सांगताना ब्राह्मण ग्रंथात कोणता दृष्टिकोन दिसून येतो, याबद्दलची आतापर्यंत चर्चा केली. आता शूद्रांचा समाजिक दर्जा ठरवून देताना ब्राह्मण ग्रंथात कोणता दृष्टिकोन ठेवण्यात आला होता, याची चर्चा करू या. या बाबतीत पहिल्यांदा ठळकपणे दिसणारी गोष्ट म्हणजे ब्राह्मण शास्त्रकारांनी शूद्रांवर लादलेली अपात्रतादर्शक बंधने व त्या बंधनांचा भंग केला तर त्याबद्दल सांगितलेल्या शिक्षा. ही बंधने व या शिक्षा यांची शास्त्रकारांनी एक लांबलचक यादी तयार केलेली आहे. सर्व संहिता आणि ब्राह्मण ग्रंथ यात आढळून येणारी बंधने व शिक्षा थोड्या आहेत. त्यांची यादी खाली दिली आहे –

 

कथक संहिता

        (१) कथक संहिता (२१-२) आणि मैत्रायणी संहिता (४-१-३१-८३) अग्निहोमासाठी ज्या गाईच्या दुधाचा उपयोग करावयाचा आहे, ते दूध शूद्राला मिळू देऊ नये.”

   

मैत्रायणी संहिता

          (२) शतपथ ब्राह्मण (३-१-१-१०), मैत्रायणी संहिता (७-१-१-६) आणि पंचवीस ब्राह्मण (६-१-११) - “यज्ञ करीत असता शूद्रांशी बोलू नये आणि यज्ञाच्या वेळी शूद्राने उपस्थित होऊ नये."

 

शतपथ ब्राह्मण

       (३) शतपथ ब्राह्मण (१४-१-३१) आणि कथक संहिता (११-१०)- "सोमरस पिण्याच्या वेळी शूद्राला जवळ येऊ देऊ नये. सोमरस पिऊ देऊ नये."

ऐतरेय ब्राह्मण

               (४) ऐतरेय ब्राह्मण (७-९२-४) आणि पंचवीस ब्राह्मण (७-१-११) - "शूद्र हा दुसऱ्यांचा नोकर आहे. (आणि नोकराच्या कामा शिवाय त्याला कोणतेही काम करता येणे शक्य नाही)"

 

        बंधन व शिक्षा यांची यादी मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत वाढत इतकी वाढली की शूद्रांच्या मानवी जीवनाला पूर्णपणे घरून तिने त्यांचे जीवन अक्षरशः मातीमोल करून टाकले. आपस्तंब, बौधायन इत्यादी सूत्रकार आणि मनू वगैरे स्मृतिकार यांनी सदर यादीत पुढे जी भर टाकली व ती यादी पुढे पुढे अतिशय वायुवेगाने वाढत गेली, ही वस्तुस्थिती लक्षात धरली तर वर केलेल्या विधानाचे स्वरूप नीटपणे कळून येईल.

        जी अपात्रतादर्शक बंधने शूद्रांवर लादलेली आहेत त्यांची जंत्री डोळ्यांसमोर धरली तरच त्या बंधनांचा घातकीपणा किती तीव्र स्वरूपाचा आहे हे कळून येईल. ती बंधने संख्येने इतकी आहेत व इतक्या भिन्न स्वरूपांची आहेत की, त्यांचे सत्यस्वरूप संपूर्णपणे उघड करून दाखविणे दुरापास्त होऊन बसलेले आहे. या बंधनांच्याबद्दल ज्यांना काही कल्पना नाही त्यांच्या माहितीसाठी मी निरनिराळे सूत्रकार व स्मृतिकार यांच्या ग्रंथांतून ती माहिती जमा करून खाली देत आहे.

 

                                ()

                                 

                                                          आपस्तंब धर्मसूत्र

 

(अ)    आपस्तंब धर्मसूत्र

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा चार जाती आहेत.

        यातील प्रत्येक जात जन्मतः दुसऱ्या जातीपेक्षा क्रमानुसार श्रेष्ठ आहे. (प्रश्न १, पाताळ १, खंड १, सूत्रे ४-५). सर्व शूद्र व इतर जातींतील ज्यांनी दुष्कृत्ये केलीत ते लोक, हे बाद करून बाकीच्या सर्व जातीतील लोकांना (१) उपनयन विधी, (२) वेदाभ्यास आणि पवित्र अग्नी पेटविणे (यज्ञ करण्याचे अधिकार) ही कृत्ये करण्याचे अधिकार आहेत." (प्रश्न १, पाताळ १, खंड, सूत्र ६)

 

    (ब) वसिष्ठ धर्मसूत्र

       ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा चार जाती (वर्ण आहेत.)

       ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन जातींतील लोकांना द्विज म्हणतात.

        त्यांचा पहिला जन्म त्यांच्या मातेपासून; दुसरा जन्म यज्ञोपवीत विधीपासून. या विधीत सावित्री माता असते, पण गुरुजीला बाप म्हणून समजतात.

       गुरुजीला बाप म्हणून एवढ्याचसाठी समजतात की, तो वेदाभ्यासाची दीक्षा देतो. (अभ्यास २, श्लोक १-४).

       वेदांत म्हटले आहे की, "ब्राह्मण त्याचे मुख होता; क्षत्रिय त्याचे बाहू झाला; वैश्य त्याच्या मांड्या झाला; शूद्र त्याच्या पायापासून जन्मला."

       "ब्राह्मण व गायत्री (वृत्ती) यांना बरोबर, क्षत्रिय आणि त्रिष्टभ् यांना बरोबर, वैश्य आणि जागति यांना बरोबर आणि शूद्र वृत्तविरहित यांना त्याने उत्पन्न केले." (प्रकरण ४, श्लोक ३.)

        

मनुस्मृती

 

(क)    मनुस्मृती

"जग निर्माण करणाऱ्या परमेश्वराने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांना अनुक्रमे स्वतःच्या मुखापासून, बाहूंपासून, मांड्यापासून व पायांपासून जगाच्या सुखसमृद्धीसाठी निर्माण केले. (अध्याय १, श्लोक ३१).

       ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन द्विज जाती होत; परंतु चौथी जात शूद्र हिला एकच जन्म आहे." (अध्याय १०, श्लोक ४)

 

                                  (२)

 

(अ)    आपस्तंब धर्मसूत्र

 

स्मशानात किंवा स्मशानाजवळ अथवा स्मशानापासून हांकेवरच्या अंतरावर त्रैवार्षिक कधीही वेदांचा अभ्यास करणार नाही.

     ते ठिकाण स्मशानभूमी म्हणून त्याला माहीत असेल त्याने त्या ठिकाणी वेदांचा अभ्यास करू नये.

     शूद्र व जातिबहिष्कृत माणूस या दोघांना स्मशानभूमीप्रमाणे समजावे, सहाव्या सूत्रात दिलेला नियम त्यांना लागू आहे.

     काहींचे असे मत आहे की, ज्या घरात ते एकत्र राहातात, त्यांनी तेथे एकत्रपणे वेदांचा अभ्यास करण्याचे टाळावे.

      परंतु वेदाभ्यासी विद्यार्थी आणि शूद्र वा स्त्री यांची सहज नजरभेट झाली तरी त्या विद्यार्थ्याने वेदघोष बंद केले पाहिजेत. (प्रश्न १ - पाताळ ३, खंड ९, सूत्रे ६-११)

      अस्वच्छ ब्राह्मण किंवा इतर द्विज जातीतील अस्वच्छ माणूस यांनी अन्नाला स्पर्श केला तर ते अन्न अस्वच्छ होते, पण ते खाण्यास अयोग्य होत नाही. परंतु अस्वच्छ शूद्राने काहीही आणलेले असो - मग त्याला त्याचा प्रत्यक्ष स्पर्श झालेला असो वा नसो - ते कदापिही खाऊ नये.

      एखाद्याला शुद्राचा स्पर्श झाला तर त्याने जेवण घेऊ नये" (प्रश्न १, पाताळ ५, खंड १६, सूत्रे २१-२२)

                              विष्णुस्मृती


(ब) विष्णुस्मृती

      द्विज जातीतील मृत मनुष्याला स्मशानात नेण्यासाठी शूद्राला मग तो शूद्र मृत मनुष्याचा नातेवाईक असला तरी, कोणीही हात लावू देऊ नये.

     उलटपक्षी कोणत्याही द्विजाने मृत शूद्राला उचलून स्मशानात नेऊ नये.

     मृत आईबापांना उचलून त्याच्या पुत्रांनी स्मशानात न्यावे. (अशा पुत्रांची व मृत आईबापांची एकच जात असली पाहिजे)

     शूद्रांनी द्विज जातीतील मृत मनुष्याला, मग तो मृत मनुष्य जरी त्या शूद्राचा बाप असला तरी, उचलून स्मशानात नेऊ नये.” (अध्याय १९, सूत्रे १-४)

 

(क) वसिष्ठ धर्मसूत्र

      "म्हणून, काय खावे व काय खाऊ नये, याबद्दल आता आम्ही सांगतो.

       वैद्य, शिकारी, बदफैली स्त्री, राज-दंड वाहणारा, चोर, अभिशास्ता, हिजडा आणि जातिबहिष्कृत माणूस यांनी दिलेले अन्न खाऊ नये.

      त्याचप्रमाणे कवडीचुंबक, श्रौत यज्ञाचा पहिला विधी ज्याने केलेला आहे असा माणूस, कैदी, आजारी, सोमवृक्षाच्या वेली विकणारा, सुतार, परीट, कुलाल, हेर, व्याजाने कर्ज देणारा सावकार आणि पायताणे शिवणारा चांभार यांनी दिलेले अन्न खाऊ नये.

      त्याचप्रमाणे, शूद्राने दिलेले अन्न खाऊ नये. (अध्याय १४, श्लोक १-४) यमाने यासंबंधी जे उद्गार काढलेले आहेत ते खालील श्लोकांत दिलेले आहेत. लोक या श्लोकांचा आता आधार घेतात.

      दुष्ट शूद्रवंश ही स्मशानभूमी होय हे उघड आहे. म्हणून शूद्रांच्या सान्निध्यात वेदघोष कधीही करू नये. (अध्याय १८, श्लोक ११-१५).

     काही जण पवित्र विद्याभ्यास करून व काही घोर तपश्चर्या करून दान स्वीकारण्यास योग्य झाले. परंतु ज्याच्या पोटात शूद्राने दिलेले अन्न गेलेले नाही, असा ब्राह्मण दान स्वीकारण्यास सर्वांपेक्षा योग्य होय. (अध्याय ६, श्लोक - २६).

     शूद्राने दिलेले अन्न पोटात असता जर ब्राह्मण मेला तर पुढच्या जन्मात तो एखाद्या गावातील डुक्कर म्हणून जन्मेल; किंवा ज्या शूद्रचे अन्न त्याच्या पोटात होते त्या शूद्राच्या कुटुंबात तो ब्राह्मण पुढील जन्म घेईल.

     कारण शूद्रांचे अन्न खाल्ल्यामुळे त्या अन्नाची सत्वे ब्राह्मणाच्या रक्तामांसात मिसळलेली असतील, अशा स्थितीत त्याने वेदमंत्रांचा घोष दररोज केला किंवा त्याने दरोज अग्नीची पूजा केली किंवा परमेश्वराची प्रार्थना केली, तरी तो स्वर्गाच्या मार्गाला जाऊ शकणार नाही.

       परंतु, जर ब्राह्मण शूद्राचे अन्न खाल्ल्यानंतर सजातीय पत्नीबरोबर रममाण झाला व त्यापासून त्याला मुलगे झाले तर ते मुलगे शूद्र जातीचे मानण्यात येतील; व अशा त-हेच्या ब्राह्मणाला स्वर्गप्राप्ती होणार नाही." (अध्याय ६, श्लोक २७-२९)

 

(ड) मनुस्मृती

      शूद्रांचे राज्य, किंवा अधार्मिक लोकांनी चालविलेले राज्य, अथवा धर्मलंड लोकांनी हल्ला करून घेरलेले राज्य किंवा हलक्या कुळीत जन्मलेल्या लोकांनी काबीज केलेले राज्य यात ब्राह्मणाने वास्तव्य करू नये. (अध्याय ४, श्लोक ६१).

        जो ब्राह्मण शूद्रासाठी यज्ञकर्मे करतो त्याला श्राद्धविधीसाठी आमंत्रण देऊ नये. श्राद्धाच्या जेवणापासून जे काही फायदे होणार असतील ते अशा ब्रह्मणाच्या उपस्थितीमुळे नष्ट होतील. (अध्याय ३, श्लोक १७८).

       शूद्रांचे प्रेत गावाच्या दक्षिण वेशीतून स्मशानाकडे न्यावे; परंतु द्विजांची प्रेते अनुक्रमे पश्चिम, उत्तर व पूर्व वेशीतून स्मशानाकडे न्यावीत.” (अध्याय ५, श्लोक ९२).

                  

                              (३)

 

(अ) आपस्तंब धर्मसूत्र

       "उजवा हात पुढे करून व तो कानाच्या समातर रेषेत धरून ब्राह्मणाने नमस्कार करावा. उजवा हात छातीच्या पुढे आडवा धरून क्षत्रियाने नमस्कार करावा. उजवा हात कमरेच्या समांतर रेषेत करून वैश्याने नमस्कार करावा. दोन्ही हात जोडून व ते खाली लववून व पुढे करून शूद्राने नमस्कार करावा.” (प्रश्न १, पाताळ २, खंड ५, सूत्र १६)

      द्विज जातीच्या माणसाने केलेल्या नमस्काराला प्रतिनमस्कार करावयाचा तर ज्याला तो प्रतिनमस्कार करावयाचा त्याच्या नावातील शेवटले अक्षर असे उच्चारले पाहिजे की, ते दूरवर ऐकू जाईल. (प्रश्न १, पाताळ २, खंड ५, सूत्र १६).

      ब्राह्मणाच्या घरी जर शूद्र पाहुणा म्हणून आला तर पहिल्यांदा त्या शूद्र पाहुण्याला ब्राह्मणाने काहीतरी काम करावयास लावावे व त्यानंतर वाटल्यास त्याला जेवण द्यावे.

शूद्राकडून काही काम करून न घेता त्याला जर ब्राह्मणाने जेवण दिले तर ब्राह्मणाने त्या शूद्राचा आदरसत्कार केला, असे होईल.

       अथवा, ब्राह्मणाच्या घरात जे चाकर असतील त्यांनी राज-कोठारातून तांदूळ आणावेत व त्याचे शूद्र पाहुण्याला पक्वान्न घालू त्याचे आदरातिथ्य करावे.” (प्रश्न १, पाताळ २, खंड ४, सूत्रे १९-२०)

 

(ब) विष्णुस्मृती  

   आपल्या घरी एखाद्या शूद्राचा जे आदरसत्कार करील किंवा जो देवासाठी तयार केलेले हवनपदार्थ अथवा श्राद्धाचे अन्न एखाद्या धर्मिक तपस्व्याला देईल त्याला १०० पण दंड भरावा लागेल. (अध्याय ५, सूत्र ११५).

 

(क) मनुस्मृती

       'एखाद्याला ब्राह्मण भेटला तर तो ब्राह्मण आपल्यापेक्षा १० वर्षांनी वडील आहे. असे त्याने समजून वागावे. हे लोक आपले वडील होत व आपण त्यांचा मुलगा होय, असे त्याने समजावे. त्याला ब्राह्मण व क्षत्रिय हे एकाच वेळी भेटले तर ब्राह्मण यालाच स्वतः वडील मानावे.

      संपत्ती, नातेवाईक, वयोमान, धर्मपंथ व ज्ञान या पाच कारणांनी समाजात आदर मिळतो. शेवटचे कारण हे सर्वात अत्यंत महत्त्वाचे आहे..

      पहिल्या तीन वर्गातील ज्या एखाद्या वर्गाच्या मनुष्यामधे या पाच कारणांचे अस्तित्व उत्कटपणे बघावयास मिळते तो या पृथ्वीतलावर आदरास जास्त पात्र होतो. परंतु एखाद्या शूद्राजवळ संपत्ती व ज्ञान याचे केवढेही भांडार असले तरी तो केवळ त्या कारणांमुळे आदरास पात्र ठरत नाही. शूद्र आपल्या वयोमानाने मात्र आदरास पात्र होतो; मात्र तो जेव्हा १०० वर्षांचा होतो तेव्हाच, त्यापूर्वी नाही. (अध्याय २, श्लोक १३५-१३७).

        जो ब्राह्मण आपल्या वर्णात ज्ञानाने समृद्ध असेल तो सर्व ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ होय. जो वैश्य आपल्या वर्णात संपत्तीने समृद्ध असेल तो सर्व क्षत्रियांपेक्षा श्रेष्ठ होय. जो शूद्र आपल्या वर्णात वयोमानाने जास्त असेल तो सर्व शूद्रांपेक्षा श्रेष्ठ होय.

        म्हणून एखाद्याचे डोके पांढरे झालेले असेल त्याला वयोवृद्ध समजू नये. वयाने लहान असला तरी ज्याला वेदांचे ज्ञान झालेले आहे त्याला देव वयोवृद्ध समजतात. (अध्याय २, श्लोक १५४-५६).

        ब्राह्मणाच्या घरात जर क्षत्रिय, वैश्य अगर शूद्र राहिला तर त्या ब्राह्मणाचा तो पाहुणा मित्र किंवा नातेवाईक अथवा गुरू म्हणून होत नाही. (म्हणजे फक्त ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाच्या घरात पाहुणा होतो. दुसऱ्या कोणाला होता येत नाही.)

       ब्राह्मणाच्या घरचे जेवण आटोपल्यावर त्या घरात जर एखादा क्षत्रिय पाहुणा म्हणून आला तर सदर ब्राह्मणाने त्याला त्याने मागितले तर अन्न द्यावे.

       जर वैश्य अगर शूद्र ब्राह्मणाच्या घरी पाहुणा म्हणून आला तर त्या ब्राह्मणाने पाहुण्याला आपल्या नोकरांच्या हस्ते अन्न द्यावे व गोडगोड बोलावे" (अध्याय ३, श्लोक ११०-११२).


          शुद्रांचा दर्जा कोणता , याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथांंतील प्रमेय भाग २ लवकरच प्रकाशित करण्यात येईल.

 


Post a Comment

0 Comments